शहरात टँकरच्या संख्येत वाढ   

पुणे : एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका वाढलेला असताना शहरात महापालिकेने ४७ हजार ८३६ टँकरफेर्‍यांद्वारे पाणी पुरवले. गतवर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत यंदाच्या टँकरफेर्‍यात सहा हजार २३३ ने तर २०२३ च्या तुलनेत १४ हजार १९३ फेर्‍यांची वाढ झाली आहे. 
 
एप्रिल महिन्यात महापालिकेतर्फे टँकरच्या ४७ हजार ८३६ फेर्‍या झाल्या. गतवर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत टँकरफेर्‍यांमध्ये सहा हजार २३३ ने वाढ झाली आहे. तर २०२३ च्या तुलनेत तब्बल १४ हजारांनी वाढ झाली आहे. सन २०२३-२४ च्या एप्रिल महिन्यात टँकरच्या एकूण ३३ हजार ६४३ फेर्‍या झाल्या होत्या. सन २०२४-२५ मध्ये टँकरच्या ४१ हजार ६०३ फेर्‍या झाल्या. तर २०२५-२६ मध्ये महापालिकेकडे ४७ हजार ८३६ टँकरफेर्‍यांची नोंद झाली आहे.  महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील टँकरफेर्‍यांच्या नोंदीतून ही बाब समोर आली आहे.
 
शहरात जेथे पाणीपुरवठा होत नाही किंवा जेथे काही कारणाने पाणी पोहोचू शकलेले नाही, अशा ठिकाणी महापालिकेतर्फे मोफत टँकर दिले जातात. महापालिकेकडे टँकरची संख्या कमी असल्याने ठेकेदारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. किमान आठ टँकर असलेल्या ठेकेदारांमार्फत अन्य ठिकाणी पाणी पोहोचवले जाते. यासाठी पालिका ठेकेदारांना शुल्क देते. तर ज्या सोसायट्यांना पाणी कमी पडते किंवा त्यांना अतिरिक्त पाण्याची गरज आहे, अशा सोसायट्या निश्चित शुल्क (चलन) भरून टँकर विकत घेतात. या प्रकारच्या टँकर फेर्‍यांची नोंद पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे ठेवली जाते.
 
खासगी टँकरचालकांकडून लूट ?
 
याशिवाय खासगी टँकरचालक आपला पाणीसाठा वापरून पाणीपुरवठा करतात. त्यांच्यावर पालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. तसेच त्यांची नोंदही पालिकेकडून ठेवली जात नाही. यात बहुतांश वेळा वापरायच्या पाण्यासाठी हे खासगी टँकर बोलावले जातात. मात्र, त्यांच्या शुल्कावर नियंत्रण नसल्याने काही टँकरचालकांकडून भरमसाठ शुल्क आकारून अडवणूक केली जाते, अशी तक्रारही नागरिकांकडून केली जाते.
 
टँकर               फेर्‍या
 
एप्रिल २०२३     ३३,६४३
एप्रिल २०२४     ४१,६०३ 
एप्रिल २०२५     ४७,८३६
मार्च २०२५       ४७,८९६
 
मार्चच्या तुलनेत किंचित घट
 
मार्च २०२५ च्या तुलनेत एप्रिल महिन्यात शहरात उकाडा अधिक होता. तापमानाने चाळीशी ओलांडली होती. असे असतानाही महापालिकेने पुरवलेल्या टँकरसंख्येत अल्पशी (६०) घट झाली आहे. महापालिकेने मार्च महिन्यात  ४७ हजार ८९६ टँकरफेर्‍यांद्वारे पाणी पुरवले होते. त्या तुलनेत एप्रिल महिन्यात उकाडा अधिक असूनही टँकरफेर्‍यांची संख्या काहीशी घटली आहे. एप्रिल २०२५ मध्ये ४७ हजार ८३६ टँकरफेर्‍यांची नोंद पालिकेने केली आहे.

Related Articles